शहरात रमजान ईद उत्साहात   

पुणे : रमजान ईदनिमित्त सामाजिक सलोखा आणि शांततेसाठी सामूहिक प्रार्थना करीत नमाज पठणाने व नमाज पठणानंतर एकमेकांना आलिंगन करत ‘ईद मुबारक’ म्हणत शुभेच्छा देत मुस्लिम बांधवांकडून सोमवारी रमजान ईद उत्साहात साजरी करण्यात आली.
 
नमाज पठणासाठी ईदगाह मैदानावर हजारो मुस्लिम बांधव जमले होते. यावेळी लहानग्या मुलांनीही एकमेकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्वत्र आनंदाचे वातावरण पहायला मिळाले. ईदच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून गोलीबार मैदान परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच, पोलिसांकडून या भागात वाहतूकीत बदल देखील करण्यात आले होते. सकाळी अनेकांनी मशिदीत तर काहींनी घरात नमाज पठण केले. घरी आमंत्रित केलेल्या मित्रमंडळी व नातेवाईकांनी दुपारी शीरखुर्मा व बिर्याणीच्या आस्वाद घेतला. काही तरुण व लहान मुलांनी नवे कपडे परिधान करून थंड पेय, आईस्क्रीम खात आपली ईद पार्टी साजरी केली. कुरेशी मशीद चौकात लहान मुलांसाठी खेळण्याचे साहित्य ठेवण्यात आल्याने दिवसभर मुलांनी तेथे आनंद लुटला.
 
रमजान ईदनिमित्त रात्री उशिरापर्यंत बाजारपेठा सुरू होत्या. ईदनिमित्त शहरातील विविध ईदगाह व मशिदी विद्युत रोषणाईने उजळून निघाल्या होत्या. नवीन कपडे, पारंपारिक वेशभूषा, शिरखुर्म्याचा आस्वाद आणि अत्तराचा सुगंध अशा वातावरणात रमजानचा उत्साह सोमवारी सकाळपासूनच शहरात दिसत होता. याशिवाय गोळीबार मैदान परिसरात इदगाह मैदान येथे सकाळपासूनच रंगीबेरंगी कपडे घालून सुमारे चाळीस हजारांहून अधिक मुस्लिम बांधवांनी एकत्र येत ईदच्या नमाजचे पठाण केले. देशाच्या भविष्यासाठी प्रार्थना केली. राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटना, ईदगा ट्रस्ट आणि पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘ईद मिलन’ कार्याक्रमात सर्व मुस्लिम बांधवांचे गुलाब आणि शिरखुर्मा देत रमझान ईद मोठ्या उत्साहाने साजरी करणात आली.

Related Articles